वर्षाचा शेवटचा दिवस.
वर्षभरापूर्वी आपल्या आयुष्यात आलं २0११. तेव्हा कुणी विचार केला होता की, या वर्षात ‘हे असं’ एवढं सारं होईल.!
नुकत्याच भेटलेल्या दोन अनोळखी माणसांसारखे. नवं वर्ष आणि आपण पाहतच होतो एकमेकांकडे.
‘चांगलं’ वागण्याचा प्रयत्नही करत होतो.
पण कॅलेण्डरचं एक पान उलटायच्या आत, आपण वागू लागलो आपल्यासारखेच आणि नव्या सहस्त्राकातलं पहिलं दशक पचवून आलेलं हे वर्ष आपले रंग दाखवू लागलं. म्हणता म्हणता नाचवू लागलं, आपल्याला त्याच्या तालावर.!
आपणही कधी रंगलो त्याच्या रंगात आणि कधी मनासारखे घडवले दिवस आपल्या कष्टानं, जिद्दीनं आणि प्रसंगी हट्टानंही.!
आज मागं वळून पाहताना आठवतो, सरत्या वर्षातला एकेक दिवस. त्यातला एकेक क्षण.
कधी हसलो होतो मित्रांसमोर खळखळून. कधी रडलो एकेकटेच आपले आपण, आतल्या आत.
कधी उठलो चिडून, पेटून, बदलून टाकू सारा समाज, सारी व्यवस्था असं म्हणत उतरलोही चिडून रस्त्यावर.
आणि कधी केली भंकस.
म्हटलं गेला उडत सगळा गंभीर पोक्तपणा आणि दुनियेभरचा विचारबिचार. म्हणू कशालाही ‘व्हाय धीस कोलावेरी.!’ हे असं म्हणता म्हणता, विचारबिचार करता करता.
एकेक दिवस, एकेक महिना करत संपलंही वर्ष.
काय नाही दिलं या वर्षानं.?
काही आनंदाचे, सार्थकाचे क्षण दिले.! जे आपल्याला कधीच मिळणार नाही, असं वाटलं होतं
ते सहज देऊन टाकलं.
सांगा, कधी वाटलं होतं की, जिंकू आपण क्रिकेटचा वर्ल्डकप.
पण जिंकलो की सहज.!
आणि सचिनची सेंचुरी.? अजून पाहतोय आपण वाट.!
ज्यानं ९९ शतकं ठोकली त्याचं एक शतक होऊ नये.? - भरभरून देताना, सगळंच देऊन नाही टाकलं या २0११ने. ठेवलीये काही अतृप्तता.!
नव्यानं नवीन काहीतरी कमावण्याची, मिळवण्याची, झगडण्याची आणि मनासारखं होता होता, मनासारखं नाही झालं काही, तरी उमेदीनं कसं जगायचं हे सांगणारी.
आपल्या वर्ल्डकप जिंकण्यापासून, रस्त्यावर उतरण्यापर्यंतची. कोलावेरी डी पासून चिकनी चमेलीपर्यंत वाट्टेल त्या गोष्टीमागे पागल होण्याची. स्टीव जॉब्ज नावाचा न पाहिलेला माणूस कायमचा निरोप घेऊन गेला म्हणून हळहळण्याची, अण्णांच्या आंदोलनाला सर्मथन देता देता मुठी आवळण्याची आणि त्या आंदोलनातही आपलं ‘फॅशन स्टेटमेण्ट’ करण्याची.!
आपणच आपल्याला पुन्हा भेटण्याची. आणि जे कमावलंय ते उराशी बाळगून जे मिळालंच नाही त्यासाठी २0१२ एक आव्हान म्हणून स्वीकारण्याची.!
फ्लॅशबॅक नव्हे हा, ही आहे आपणच
या वर्षाच्या पानांवर लिहिलेली एक डायरी.
तिच्या जुन होत चाललेल्या कागदांवर काही हसरे-दुखरे क्षण भेटले तर भेटा त्यांना.
निरोप कसला घ्यायचा त्यांचा.
ते असतीलच सोबत.आपल्याबरोबर.!
नवीन वर्ष , हो आता सुरुवात होणार? पण कधी हा विचार केला आहे का? जे मागच्या वर्षी गमावले ते परत या वर्षी नाही गमवायचे ? जे करायचे होते ते नाही झाले पण या वर्षी कारयाचेच? किव्हा परत तेच विसरून जायचे ? विचार करा ? कुटे आहोत आपण ?
No comments:
Post a Comment
हर गडी बदल रही रूप जिन्दगी...