Monday, August 8, 2011

विवाह...प्रेम विवाह..अरेंज विवाह...जोडीदार...संबंध..

प्रेम म्हणजे ती, प्रेम म्हणजे ईश्वर, प्रेम म्हणजे सर्वस्व, प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे जबाबदारी, प्रेम म्हणजे धोका, प्रेम म्हणजे गुंता, प्रेम म्हणजे ताप, फन, क्रश, अ गुड टाइमपास, अट्रॅक्शन…...! प्रेमाची परिपूर्ण व्याख्या आजतागायत कोणी केली नाही असं म्हणतात . पण प्रत्येक जण स्वत:च्या अनुभवातून एक प्रेमाची व्याख्या करतो आणि काळानुसार बदलत राहतो. कोणत्याही वयात होणा-या या प्रेमात पडण्याचं खरं वय म्हणजे शाळा आणि कॉलेजचे दिवस. या काळात जमलेली प्रेमप्रकरणं तुटतातही तितक्याच लवकर. अफेअर्स होणं आणि तुटणं याचं प्रमाणही याच काळात जास्त असतं. कारण या काळात होणारी अफेअर्स ही ब-याचदा “माझ्या इतर मित्र - मैत्रिणींचं अफेअर आहे आणि माझं नाही, अरे कॉलेजमध्ये प्रेम नाही करणार तर केव्हा करणार, बंक मारायला काहीतरी कारण हवं, टाइमपास कसा करणार” या आणि यासारख्या अगदी क्षुल्लक कारणांनी होत असतात.

त्यामुळे यातली फार थोडी कपल्स पुढे जाऊन लग्नाचा निर्णय घेतात. काहीजणांना प्रेम म्हणजे टाइमपासच वाटतो. यापलीकडे जाऊन विचार करण्याची त्याना गरज ही वाटत नाही. मिस कॉल दिल्यावर हमखास फोन करेल अशी व्यक्ती म्हणजे बॉयफ्रेण्ड असतो. त्यामुळे मेसेज आणि फोन या दोन गरजा भागवण्यासाठी बॉयफ्रेण्ड असावा, या शिवाय कॅण्टीनची आणि हॉटेल्सची बिलं भरण्यासाठी, महागडी गिफ्ट्स मिळवण्यासाठी, नवीन फिल्म्स पाहता यावेत यासाठी बहुतांश अफेअर्स करतात, तर आपली बॅग - टोपी सांभाळण्यासाठी, आपल्या नोट्स आणि जर्नल्स पूर्ण करण्यासाठी मुलांना गर्लफ्रेण्ड हवी असते.

याशिवाय यामागे असणारं एक सामाइक कारण म्हणजे शारीरिक आकर्षण. या प्रेमाची परिणती पुढे लग्नात व्हावी किंवा होऊ शकते असा विचार करणारी फार थोडी मुलं - मुली असतात. या दिवसात प्रेम म्हणजे एकत्र पिक्चरला जाणं, एकत्र फिरणं, एकत्र राहणं एवढ्यापुरतंच मर्यादित राहतं.

कॉलेजनतंर सगळेच जण करिअरच्या गर्तेत सापडतात. तेव्हा मात्र त्यांच्या लाइफ पार्टनरबद्दलच्या संकल्पना बदललेल्या असतात. भावुकपणा संपून प्रॅक्टिकल विचारांनी त्यांना वेढलेलं असतं. गर्ल / बॉयफ्रेण्ड मोकळ्या स्वभावाचा हवा असा विचार करणारी पिढी लग्नाचा विचार मात्र गांभीर्याने करायला विसरत नाही. त्यावेळी शक्य तर आपल्याला पुरक असा जोडीदार शोधला जातो. हेच त्यांच्या भाषेत सांगयचं तर 'परफेक्ट मॅच' शोधला जातो. यात मुला-मुलींच्या मागण्या ठरलेल्या असतात .

यात काही गोष्टी कॉमन असतात. मुलांना त्यांची बायको करिअर आणि घर सांभाळणारी पण आधुनिक राहणीमानाची हवी असते. चारचौघात उठून दिसणारी हवीच पण ती फक्त आपली राहावी हा एक अट्टहासही असतो. सौंदर्य हा यात सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. मुली शक्यतर आर्थिक स्टेबिलिटी पाहतात - तो कुठे काम करतो, किती पगार घेतो - याचा विचार करतात. करिअरला प्राधान्य देणारी यंग जनरेशन लग्न करताना आपला पार्टनर करिअरच्या दृष्टीने किती पूरक आहे, असा विचार करतात. करिअरच्या बाबतीतले एकमेकांचे विचार किती मिळतात, यावरून ते स्वत:चा लाइफ पार्टनर निवडतात. लग्न या नात्यात सहचर्यापेक्षा हक्क ही भावना अधिक दृढ असते.

खरंतर लाइफ पार्टनर निवडणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. पण याबाबत विचार करताना बहुतांश मुलं-मुली करिअरचाच जास्त विचार करतात. त्यामुळे प्रेम हे कॉलेज सोडल्यानंतरही त्यांच्याकरता एक सामान्यच गोष्ट राहते. एकदा लग्न केलं, की कोणाबरोबरही अटॅचमेण्ट होते असं त्यांचं ठाम मत असतं. त्यामुळे प्रॅक्टिकल विचारांच्या या मुलामुलींना इमोशनल फिलिंग्स म्हणजे नॉन्सेन्स वाटतात.

मुलांना लग्न म्हणजे एक बंधन वाटतं. सर्वात जवळच्या मैत्रिणीबद्दल त्यांना काळजी वाटते, तिचा सहवासही आवडतो. पण ती मैत्रीण न राहता जेव्हा पत्नी होणार तेव्हा तिच्या अपेक्षाही बदलणार. म्हणजे आता एखाद्या मुलीशी जर मी बोलत असेल तर कदाचित ती चेहरा वेडावाकडा करेल पण लग्नानंतर मी मुलींशी बोललेलं तिला आवडणारच नाही. प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं लागणार, मित्रांबरोबर कधीही फिरण्यावर बंधन येणार, जबाबदारी घ्यावी लागणार, सवयी बदलाव्या लागणार. यामुळे कटकट वाढणार. म्हणजे एकंदरीतच मैत्रीण बायको झाल्यावर मला पूर्ण बदलणार. लग्नामुळे आपलं स्वातंत्र्य हिरावलं जाणार... या विचारांनी लाँग-टर्म नात्याची लगेचच कबूली द्यायला मुलं टाळतात.

याउलट, मुली जन्मताच भावूक असतात. एखादा मुलगा आपली काळजी घेतोय, त्याच्याविषयी आपल्याला जवळीक वाटतेय म्हणजे हाच आपल्या जीवनाचा जोडीदार असायला हवा असा तिचा अट्टाहास असतो. म्हणून अधिकाधिक ती त्या मुलात गुंतत जाते. मैत्रीच्या नात्यात बंधन नाहीत, पण लग्नानंतर ती येतील याची मुलाला भीती वाटते, म्हणून ते कमीटमेण्ट करत नाहीत. तर मैत्रीत काही बंधनं नसल्यामुळे हा आपल्याला कधीही सोडून जाईल ही भीती मुलींना असते, म्हणून त्या कमीटमेण्टचा आग्रह धरतात. मुलींच्या मते, लग्नासाठी प्रेम हेच महत्त्वाचं, तर मुलांच्या मते लग्नानंतर प्रेम संपतं आणि सांभाळावे लागतात ते खर्च आणि कुटुंबाच्या मागण्या.

अर्थात दोघंही आपल्या बाजूने बरोबर आहेत. कारण लग्नात प्रेम तर आहेच पण त्यागही आहे आणि जबाबदारीही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा दोघांचा निर्णय आहे. म्हणून आपल्या जोडीदाराला विचार करायला वेळ द्या. त्याचबरोबर त्याच्या मताचाही आदर करायला हवा. तो मुलगा तुम्हाला फक्त मैत्रीण मानत असेल तर त्याचाही स्वीकार करा. त्यात अडकून स्वत:ला कमी लेखून नैराश्य ओढावून घेऊ नका. मुलांनीही आपलेच विचार योग्य आहेत यावरच ठाम न राहता लग्नानंतरही ती आपली चांगली मैत्रीण कशी राहील, याचा विचार केला पाहिजे. तसंच योग्य बंधनामुळे दोघांवरही मर्यादा येऊन जीवनाला एक चौकट मिळेल. म्हणूनच हा विषय न टाळता परस्परांशी चर्चा करा.

प्रत्येक महिन्यात किमान सात दिवस संध्याकाळी जोडीदारांनी फक्त एकमेकांना वेळ द्यावा. डीनर एकत्र करावं. महिन्यातून किमान दोनदा तरी दोघांनी सोबत पिकनिकला जावं. एखादा सिनेमा जोडीनं पाहावा. त्यामुळे संवाद वाढतो, विश्वास दृढ होतो.

लग्न ठरवताना जाती-धर्म, नोकरी, पगार, वय आदी प्राथमिक निकष लावण्यासोबतच एकमेकांच्या व्हॅल्यूज, विचारसरणी, आवडीनिवडी, गोल, अपेक्षा, लाइफस्टाइल जाणून घेतली पाहिजे. व्हॅलण्टाइनला प्रेमाने लग्नाचा निश्चिय करताना थोडा या गोष्टींचाही विचार व्हावा.

शाळानिवडीपासून करिअर ठरवताना दहावेळा विचार होतो. पण नातेवाईक, जाहिराती, वधू-वर संशोधन संस्था यांना हाताशी धरून काही दिवसांत लग्नाचा प्रश्न निकाली निघतो. वरवर तपासणी करून हा निर्णय घेतल्यास अनेकदा नवरा-बायको आणि दोहोंकडच्या कुटुंबांना त्रास सहन करावा लागतो. हे टाळण्यासाठी लग्न करण्यापूवीर् नेमकं काय लक्षात घ्यायला हवं याबाबतीत माझे काही विचार –

चेकलिस्ट :

विचार :
आपल्या लग्न करण्याविषयीच्या अपेक्षा स्पष्ट करा. लग्न करण्याची कारणं जोडीदाराकडून जाणून घ्या. उदाहरणार्थ, घर सांभाळणारी बायको हवी असल्यास, करिअरिस्टिक मुलगी कितीही चांगली असली तरी नंतर वादविवाद होतात. नीतिमूल्यांविषयी जोडीदाराला त्याबद्दल काय वाटतं, ते जाणून घ्या. कदाचित गरज पडल्यास वेगळ्या मार्गाने पैसे कमावण्यास त्याची हरकत नसेल किंवा वाट्टेल ते झालं तरी खरंच बोलायला हवं अशीही त्याची अपेक्षा असू शकेल. मूल्यांशी कितपत तडजोड तुम्हाला मान्य आहे? विचारसरणी समजून घ्या. एकमेकांच्या जेंडरविषयी काय मत आहे, हे लक्षात घ्या.
आवडीनिवडी - गाणं, ट्रेकिंग, फोटोग्राफी, संगीत अशा छंदांसाठी वेळ देणं, आवश्यक असतं. लग्नानंतरही तो वेळ मिळणार का, किंवा तुम्ही तो जोडीदाराला देणार का? लाइफस्टाइल मॅच होते का, ते तपासून पाहा.

व्यसन :
पाटीर्मधे ड्रिंक घेणं चालेल पण त्याची मर्यादा कुठपर्यंत? तसंच सिगारेट चालणार नसेल तर वेळीच स्पष्ट करा.

लाइफगोल :
करिअरला प्राधान्य देणार की घराला? तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे, याची स्पष्ट कल्पना एकमेकांना द्या.

विवाहपूर्व तयारी :
यामधे काही प्रश्न स्वत:ला विचारा... जसे, लग्न करण्याची माझी मानसिक तयारी आहे का, घरच्यांच्या दबावाखाली तर मी लग्नाला तयार नाही ना, लग्नाकडून काय अपेक्षा आहेत, जोडीदाराचं राहणीमान कसं असावं, जोडीदाराला मित्र मैत्रिणी असतील तर चालेल का, दोन कुटुंबामधे आथिर्क, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक तफावत असल्यास तुमची तडजोडीची तयारी आहे का, जोडीदाराच्या वेगळ्या मताची दखल घेण्याची, त्याची कदर करण्याची तयारी आहे का, सासू म्हणजे सारख्या सूचना हा विचार मनातून काढून टाकून वेगळ्या नजरेने या नात्याकडे बघणार का, संसारात खोटेपणा वादळ निर्माण करतो हे माहीत आहे का, लग्नापूवीर् चूका घडल्या असल्यास त्या विसरण्याची तयारी आहे का आणि ते जोडीदाराला सांगण्याचं मनोधैर्य आहे का, वृद्धापकाळात जोडीदाराच्या आईवडिलांची जबाबदारी घ्यायला तुमची हरकत आहे का, वेळ पडल्यास जोडीदारांच्या आईवडिलांना पैशाची मदत करायची तयारी आहे का?

जोडीदार कसा निवडावा…..?
धर्म, जात, वय, उंची, शिक्षण, नोकरी, पगार याची चौकशी तर नेहमीच केली जाते पण, त्याचसोबत पुढील गोष्टीही पडताळून पाहाव्यात.
कौटुंबिक परिस्थिती, नवऱ्याचा पगार अधिक असला तरी त्याच्यावर इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत का, असल्यास त्या सांभाळण्याची आपली तयारी आहे का, संयुक्त कुटुंबात राहणार की वेगळं घर घेणार…..?
एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी, अपेक्षा, विचार करण्याची पद्धती जाणून घ्या.
घरातलं वातावरण- स्वच्छता, राहणीमान, एकमेकांशी संवाद साधण्याची पद्धत योग्य वाटते का आणि ती जुळवून घेता येईल का? लग्नापूवीर् सासरच्या घरीही भेट द्या. जोडीदाराचे आई-वडील एकमेकांशी जसे वागतात तसंच, जोडीदाराच्या आपल्याकडून वागण्याच्या अपेक्षा असतात.

लग्नाआधीच्या भेटी :
लाइफस्टाइल, सवयी, व्यसन, प्रायोरिटीज (घर, करिअर, कुटुंब, मित्र, छंद), खाण्याच्या सवयी, स्वच्छता (आवड की अट्टाहास), सहजीवनाचं चित्रं, घरातले आथिर्क व्यवहार कोण पाहणार, नोकरी करणार का, घरातली कामं कोण करणार, घरातले निर्णय कोण घेणार (सासू-सासरे, नवरा, बायको)

मूल होऊ द्यायचं का आणि केव्हा…..?
सेक्सबद्दलची सायंटिफिक माहिती दोघांनाही आहे का?
ती करून घेण्यासाठी तज्ज्ञाकडे जाण्याची गरज आहे का?
शारीरिक किंवा मानसिक दोष, आजार आहे का?
लग्न, नातेसंबंध यावर एकमेकांचे विचार
ताण-तणावांना कसं सामोरं जाता

लग्नसोहळा कसा असावा, लग्नापूवीर् सर्व छान-छान :
याला कारण लग्नापूवीर्च्या अवास्तववादी कल्पना. चंदतारे तोडून देण्याच्या कवी कल्पना मागे पडून लग्नानंतर थेट वास्तवात उतरायला होतं. लग्नापूवीर् तुम्ही केवळ मित्र-मैत्रिणी असता. लग्न झालं की, आपापल्या घरातले संस्कार घेऊन नवरा -बायकोच्या भूमिकेत जाता. मग दोन्ही घरच्या सवयी, जडणघडणी एकमेकांवर आदळतात. त्यामुळे लग्नापूवीर् स्वत:चं आणि जोडीदाराचं असिस्टमेन्ट करायची गरज आहे. दोघांचे अनुभव इक्वली शेअर करा. लग्न तुटेल या भ्रामक समजुतीमुळे वास्तवाकडे दुर्लक्ष करू नका.

पुरुषांचा प्राधान्यक्रम - सेक्स, रोमान्स, सपोर्ट, सिक्युरिटी, लव.
स्त्रियांचा प्राधान्यक्रम - लव, केअरिंग, सिक्युरिटी, रोमान्स, सेक्स.


लग्न ठरल्यानंतर :
यामधे साधारण पाच ते सहा महिन्यांचा कालावधी पुरेसा ठरतो. अर्थात, आपण त्या कालावधीचा कसा उपयोग करतो, तेही महत्त्वाचं आहे. लग्नाआधी जोडीदाराशी, त्याच्या कुटुंबियांशी बोलणं अत्यंत गरजेचं आहे. घराचं, त्यांच्या वागण्याचं निरीक्षण करायला हवं. आपण या वातावरणाशी तडजोड करू शकतो का, ते पाहा. ओळखीच्या नातेवाईकांकडून स्थळ आलं असलं तरी पूर्ण चौकशी करा, कारण तुम्हाला आयुष्याचा निर्णय घ्यायचा असतो. प्रत्यक्ष जाऊन बोलून खात्री करून घ्या. विवाह मंडळं, इंटरनेट यावरच्या माहितीला भुलू नका.

परदेशातलं स्थळ कसं पारखायचं :
आज परदेश हा काही फार दूरचा प्रदेश राहिलेला नाही. आपले मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तिथे आजूबाजूला असतात, त्यांच्याकडून चौकशी करा. शिवाय कंपनीला मेल करून डेसिग्नेशन, पगार यांची तपासणी करता येईल. याची कल्पना त्यालाही द्या. जोडीदार घटस्फोटीत असेल तर, त्याचे डिवोर्स पेपर अवश्य पाहा. लोकांच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका.

जरा इथे सर्वाधिक लक्ष द्या :

संसार दोघांचा आहे. दोघंही करिअरिस्टिक असल्यास घरातली कामं दोघांनाही करावी लागतील. कामाची हार्ड आणि फास्ट वाटणी होत नाही. सकाळच्या घाईच्या वेळी तसंच कामावरून घरी परतल्यावर दोघांनीही कीचनमधे एकत्र काम करण्यात मजा आहे.
घरात असताना प्रोफेशनचं कव्हर बाजूला काढून ठेवा आणि मोकळेपणाने वागा. दोघांमधे स्पर्धा नको. एकमेकांशी दिवसभरातल्या घटनांचं शेअरिंग करा. लिसनिंग कॅपॅसिटी वाढवा. एकमेकांचा मूड सांभाळा, कम्युनिकेशन वाढवा. आथिर्क व्यवहारामधे स्पष्टता असू दे. महिन्याचा खर्च सहमतीने करा. स्वत:साठी स्पेस असू दे. तुमच्या आवडी अवश्य जोपासा. जोडीदारालाही त्याच्या छंदांसाठी फ्रीडम द्या. प्रेम हे नजर, संवाद, गंध, चव, स्पर्श अशा सर्व जाणिवांमधून येतं. तू मला आवडतेस/आवडतोस हे एकमेकांच्या कृतीतून दिसू दे. घरात मोबाइलचा कमीत कमी उपयोग करा.


शुभमंगल सावधान :
शिक्षण आणि नोकरी तसंच पगारासंबंधी खोटी माहिती दिल्याचं बरेचदा लग्नानंतर लक्षात येतं. नंतर, फसवणूकीचा त्रास सहन करण्याऐवजी शैक्षणिक पदव्यांची सटिर्फिकेट्स आधीच पाहणं आवश्यक आहे. याशिवाय नोकरीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पडताळणी करावी, यासाठी जोडीदाराला विश्वासात घ्या. घरात घडणारे छोटे मोठे वाद दोघांनीही आपापल्या आईजवळ नेऊ नये. त्यातून वाद अधिक चिघळतात. त्याचसोबत जोडीदाराचा अहंकार दुखावला जाईल, अशा पद्धतीने आई-वडलांकडून मदत घेणं मुलीनं टाळावं. समस्या सोडवण्यासाठी त्रयस्थ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा, मात्र ती व्यक्ती दोघांच्याही नात्यातली नसावी. मॅरेज काउन्सिलरचं मार्गदर्शनही घेता येईल.

मित्रानो, लग्न कसे करावे - प्रेम विवाह की अरेंज विवाह - हा एक दुय्यम प्रश्न आहे, परंतु जोडीदार कसा असावा हे सर्वाधिक महत्वाचे आहे. आता तुम्ही सर्वानी ठरवायचे की, "जोडीदार निवडून - विवाह कसा करावा - जोडीदाराबरोबर संबंध - कसे ठेवावेत.....?
परंतु, जर कोणाला वाटत असेल की लग्न करून आपण खूप मोठी चुक करतो आहोत किंवा लग्न करण्यात काही दमच नाही आहे, त्यानी पुनछ सर्व गोष्टींचा नीट विचार करावा आणि नंतरच निर्णय घ्यावा. तुम्हा सर्वाना, माझ्यातर्फे मनोमन हार्दिक शुभेच्छा.....!

1 comment:

  1. For this Nice and lovely Article I can Say that .. For selecting your dreamed life partner go to hindmaratha.com, It's the best Matrimonial portal for Maratha community.

    ReplyDelete

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...