Saturday, October 9, 2010

आनंदीपणे जगण्यासाठी...

 आनंदीपणे जगण्यासाठी...

काही जण नोकरी मिळाली नाही म्हणून रडत असतात, तर काही नोकरीसाठी प्रवास करावा लागतो म्हणून रडत असतात. काही जण बढती मिळत नाही म्हणून, तर काही जण बढती मिळाल्यामुळे येणाऱ्या जबाबदारीच्या ओझ्यामुळे रडत असतात. खरं तर कष्टांपासून आपली कोणाचीच सुटका नाही. समस्यासुद्धा आपल्या सगळ्यांना असतात. नोकरी मिळाली असेल, तर एक प्रकारच्या समस्या, बेकार असाल तर दुसऱ्या प्रकारच्या, अयशस्वी असू तर एक प्रकारचे कष्ट व यशस्वी असू तरीसुद्धा कष्ट करावेच लागतात. खरं तर आनंदी राहणं व रडतखडत राहणं या दोन प्रकारच्या प्रवृत्ती आहेत. कोणती प्रवृत्ती निवडायची हे आपल्या प्रत्येकाच्या हातात असते. आनंदी प्रवृत्ती निवडली तर आपल्या हिताचे ठरते. त्यासाठी-
वर्तमानात जगायला हवे ः
आपल्या सगळ्यांना नेहमी वर्तमानात समस्या जास्त असतात. आनंद नेहमी भविष्यकाळात मिळणार असतो. नोकरी मिळाल्यावर आनंद मिळेल, बढती मिळाल्यावर आनंद मिळेल, बढतीमुळे येणारी जबाबदारी पार पाडल्यावर आनंद मिळेल आदी. त्यामुळे प्रत्येक वेळी आनंद भविष्यकाळात ढकलला जातो व संपूर्ण आयुष्य त्रासदायक होऊन जाते.

प्रत्येकाला समस्या असतात अन्‌ त्या सोडविण्यासाठी भौतिक, वैचारिक, भावनिक, मानसिक साधनसामग्रीची गरज भासते. त्यासाठी शोधक नजर असावी लागते. आनंदी मन हे शोधक असते, त्यामुळे आनंदी वृत्तींच्या लोकांना पर्याय लवकर मिळतात व समस्या सोडविल्या जाऊन समाधान मिळते. संधी जास्त उपलब्ध होतात. नेहमी आपण लक्षात ठेवायला हवे-Past is History, Future is Mystery and Present is Gift, That is why we call it as "PRESENT'.

अर्थात वर्तमानकाळ ही आपल्याला मिळालेली मौल्यवान भेट आहे. रोजच्या चोवीस तासांमध्ये स्वतःसाठी एक छोटी कृती करा. ज्यामुळे तुम्हाला स्वतःला मस्त वाटेल. उदा. आरशातला निवांत क्षण स्वतःला द्या, स्नानाचा, जेवणाचा वेळ एन्जॉय करा, स्वतःसाठी गाण्याची लकेर घ्या. आपल्याला आता आनंद हवाय हे लक्षात घेऊन, "आता इथे या क्षणी' अशी कृती करा व करत राहिलात तर आनंदी वृत्ती वाढते व ती जगण्याची पद्धती होते.

स्वतःत बदल घडविता येतो ः
आनंदी राहण्यासाठी व आनंदाने जगण्यासाठी सतत शिकत राहण्याची व सर्वांकडून शिकत राहण्याची सवय हा आपल्या स्वतःमधील विधायक बदलाचा गाभा आहे. आपली स्वतःची शिकण्याची गती याचा अंदाज आपल्याला शोधता यायला हवा. स्वयंविकासाची एकच पद्धत सर्वच व्यक्तींना लागू पडत नाही. आनंदी राहायचे म्हणजे "कधीही चिडायचे नाही, कधीच रडायचे नाही, कधीच घाबरायचे नाही' हा हेका नव्हे तर या नकारात्मक भावना निर्माण होणार हे स्वीकारून त्यांची व्याप्ती, तीव्रता कमी करायची. हे सतत प्रयत्न करून त्या दिशेने पाठपुरावा करत राहिले तर आपल्याला जमू शकते. लगेच चार-सहा महिन्यांत फरक पडेल असं नाही. या संदर्भातील ही एक गोष्ट. एक वाटसरू रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसलेल्या गृहस्थाला विचारतो, ""काहो अमूक अमूक गाव किती लांब आहे इथून?
""पाच किलोमीटर..''
""किती वेळ लागेल पोहोचायला?''
""माहीत नाही''
""माहीत नाही?''
""नाही.''
"काय माणूस आहे,' अशा अर्थाने खांदा उडवून वाटसरू चालायला सुरवात करतो, पाठीमागून आवाज येतो, या चालीने गेलात तर तासाभरात पोहोचाल, ""आता कसं सांगितलंत?'' वाटसरू विचारतो, तो गृहस्थ सांगतो, ""कारण आता पाहिलं ना तुम्हाला चालताना.. म्हणून.''
आपल्यात आपण बदल घडवून आणू शकतो. कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या पद्धतीने एकमेव व अद्वितीय असते.
जगण्याचा उद्देश शोधा ः
आपल्या सगळ्यांना जीग सॉ पझलचा (Jig Saw Puzzle) खेळ माहीत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आकाराचे व वेगवेगळ्या रंगांचे तुकडे असतात. ते सर्व विशिष्ट पद्धतीने मांडले, की एक मोठा भौमित्तिक आकार तयार होतो. प्रत्येक तुकड्याची विशिष्ट जागा असते. ती जागा चुकविली तर ते पझल आपल्याला सोडविता येत नाही. आता हेच आपल्या आयुष्याला कसे लागू होत असते हे आपण पाहू या.
आपल्याला आपल्या स्वतःमध्ये काही बदल करायचे असतील तर ते आपण प्रतिष्ठेचे प्रश्‍न न करता सहजपणे करायला हवेत. जर जीग सॉ पझलमध्ये एखादी सोंगटी अनवधानाने चुकीच्या जागी लावली तर खेळ पूर्ण होऊ शकत नाही. त्याप्रमाणेच मीच का बदलू? माझा स्वभावच तसा आहे. त्याला मी काय करू असे प्रतिष्ठेचे प्रश्‍न कुचकामी आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे जगण्यातील आनंद व उद्दिष्टे आपण ठरविली की तेथपर्यंत पोहचणे ही सुद्धा आनंदयात्रा होते. कुठेही अट्टाहास निर्माण होत नाही.
थोडक्‍यात आनंदीपणे जगण्यासाठी,
उद्दिष्टे असावीत, आपल्या माहितीसाठी
समाधान त्यात नित्य नवे
बदलावे स्वतःला, विवेकी कृतीने
आनंदाचे कोंदण तेथेची आहे।। 

एक गमतीदार गोष्ट आहे. देवाने ही सृष्टी निर्माण केली. अनेक प्राणी निर्माण केले. प्रत्येक प्राण्याला विशिष्ट जीवन दिले. परस्परावलंबी जग निर्माण केले. त्याचे नियम करून ते सर्वांना लागू केले. शिवाय मानव नावाच्या प्राण्याला विशेष बुद्धी दिली. हे सगळं करण्यासाठी देवाला खूप वर्षे लागली. त्याचं काम झालं, आता हे देवाने ठरविलेले नियम सगळी जगरहाटी चालवणार होते. काम करून देव खूप दमला होता, त्याला विश्रांती घ्यायची होती. तो वस्तीपासून एका निबिड घनदाट जंगलात गेला अन्‌ विश्रांती घेऊ लागला, पण त्याला तेथे विश्रांती घेता आली नाही. मनुष्यप्राणी तेथे देवाला शोधत पोहोचला अन्‌ त्याने देवापुढे आपल्या मागण्या सादर केल्या, ""मला सुख दे, मला शांती दे, मला आनंद दे.'' देवाला खूप आश्‍चर्य वाटले, खरं तर सर्व प्राणीमात्रांपेक्षा त्याने मनुष्याला जास्तच दिले होते. ""इतर प्राणी माझे नियम पाळतात अन्‌ माझ्याकडे काहीच मागत नाहीत, या मनुष्यप्राण्यापासून लांबच राहायला हवे.'' हे मनात ठरवून देव उंच उंच पर्वतावर विश्रांतीसाठी गेला. देवाला वाटले त्याला तेथे निवांत विश्रांती घेता येईल. पण काही दिवसांतच मनुष्य तेथेही पोहचला अन्‌ सुख व आनंदाची मागणी करू लागला. आता काय करावं, कुठे जावे हे देवाला समजेना. तेवढ्यात देवाच्या डोक्‍यात छान कल्पना सुचली, त्याने अशी जागा शोधून काढली, की मनुष्य तेथे पोहचू शकणार नाही. त्याने मनुष्याच्या मनातच प्रवेश केला. तेव्हापासून जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी मनुष्य देवाला शोधतोय पण त्याला काही देव सापडत नाही. एकही माणूस आपल्या मनात डोकावून बघत नाही. तेथेच देव विश्रांती घेत बसलेला आहे अन्‌ तेथेच सुख, आनंद समाधान आहे.

खरं तर आपल्याला आनंद कुठे शोधायचा हे माहीत नसतं. आपण चुकीच्या ठिकाणी आनंद शोधत असतो, बाहेरील जगात आनंद आहे असं आपल्याला नेहमी वाटत असते. त्यामुळे आपण सतत रडगाणं गात राहतो .

1 comment:

  1. Khup chhan dada! tujha he vichar vachun mala stithit aale. mala kharach khup chhan vatale....man shant, nivant zale.

    ReplyDelete

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...