Monday, September 26, 2011

इतिहास वाचायचा आणि रंगवून सांगायचा?

शिवकाळात किल्ल्याना अनन्य साधारण महत्व होते.मात्र किल्ले घेण्याच्या इस्लामी आणि शिवाजी राजांची पद्धत यामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता.गतिमानता हा राजांच्या युद्धपद्धतीचा गाभा होता.पुरंदरच्या तहात गेलेल्या २३ किल्ल्यांपैकी एक म्हणजे कोंढाणा होय.सिंहगड मोगलाकड़े होता.त्यावर उदयभानु राठोड या ३८ वर्षाच्या राजपूत किल्लेदाराची नेमणूक केली होती.त्याच्या हाताखाली सुमारे १५०० राजपूत आणि मुस्लिम सैनिक गडाच्या रक्षनासाठी तैनात केले होते.
.
राजानी हा किल्ला घेण्यासाठी तानाजीची निवड केली होती.तानाजीने पुरंदरचे युद्ध,प्रतापगडाचे युद्ध,राजांची कोकणातील मोहिम यावर चांगली कामगिरी केली होती.तो हजार पायदल हशमांचा सरदार होता.जानेवारी १६७० चा महिना संपत आला होता.सिंहगडाची तानाजीला चांगलीच माहिती होती.त्यासाठी तानाजीने वेळ निवडली ती म्हणजे ४ फेब्रुवारीची (१६७०)संध्याकाळ.या दिवशी तिथी होती माघ वद्य नवमी.चंद्रोदय रात्री २ वाजता होणार होता.त्या आधी मिट्ट अंधारच...!!

४ फेब्रुवारीच्या संध्याकाळी तानाजीने सर्व मावल्यांसह राजगड सोडला.गुंजवणी नदी ओलांडली,सर्वजन विंडसई खिंडित पोचले.तोपर्यंत अंधार पडला होता.मशाल पेटवणे महा-धोक्याचे होते.अंधारात अंदाजानेच पाऊल टाकावे लगत होते.मध्यरात्रीनंतर सारे डोणागिरिच्या कड्याच्याजवळ जमा झाले.दोन मावल्याना हा कडा त्याच्या खाचा-खोचांसकट माहित होता.कमरेला दोर बांधून हे वीर झपा-झप कडा वर चढून गेले.मात्र यावेळी कडा चढताना सहा मावले कड्यावरुन पडून मरण पावले.त्यांची नावे आजही इतिहासाला अज्ञात आहेत.कड्याच्या वरच्या अंगाला दोर बांधण्यात आले.दोराच्या आधाराने सारे मावले वर आले अन घात झाला.उदयभानुला खबर लागली की कुणीतरी दोर चढून किल्ल्यावर घुसतय.एकच गोंधळ उडाला.चंद्रोदय झाला होता व् अगदी धूसर प्रकाश होता.गड जागा होत आहे याची चाहुल लागताच मराठयानी शस्त्रे परजली आणि सैनिकांच्या वस्तीवर धावले.काही सैनिक जागे होण्याच्या आतच त्याना मराठयानी कापून काढले.थोड्याच वेळात गडावर तीनशे मराठे आणि १५०० मोगली सैनिक असा सामना जुम्पला.
मराठ्यापुढे यश किंवा मृत्यु असे दोनच पर्याय उपलब्ध होते.तानाजी व् सूर्याजी सैनिकाना प्रोत्साहन देत सर्वत्र फिरत होते.
उदयभानुने तानाजीला हेरले आणि तो तानाजीकडे धावला.दोघानाही जखमा होत होत्या.उदयभानुच्या जोरकस वाराला अडवन्यासाठी तानाजीने ढाल पुढे केली आणि दुर्दैवाने ती ढालच तुटली.आत तानाजी उघडा पडला आणि उदय भानु जोशात आला.मर्मस्थानी वार बसून तानाजी घायल होवून खाली पडला आणि थोड्याच वेळात वीर गतीला गेला.उदयभानुही जखमा आणि रक्तस्त्रावाने खचला होता.थोड्याच वेळात तोही गतप्राण झाला.
तानाजी पडले, सुभेदार पडले,सुभेदार पडले..अशी मावळ्यांमध्ये बातमी पसरली.हाता तोन्डाशी आलेली विजयश्री आता हातून निसटते काय अशी शंकेची पाल सर्वांच्याच मनात चुकचुकली.मावळ्यांचा धीर खचला,ते पळु लागले. सुभेदार पडले म्हणून मावळ्यांचा जोश पुरता मावळला. आत काय? राजपूतही पुरते घायाळ झाले होते,पण आता मावळे पळताना पाहून त्यांच्याही चेहर्‍यावर हास्य उमटू लागले होते.

सूर्याजी हे सर्व पहात होता. पळणार्‍या मावळ्यांसमोर जाऊन उभा ठाकला. निखार्‍यासारखे लालजर्द डोळे पळणार्‍या मावळ्यांवर रोखत म्हणाला,"तुमचा बाप इथे मरून पडला आहे आणि तुम्ही असे भ्याडासारखे पळता काय? मागं फ़िरा, मी गडावरचा दोर कापून टाकला आहे,मरायचेच असेल तर गडावरून उड्या टाकून मरा नाहीतर इथं लढून मरा."
'गडावरून उड्या टाकून मरण्यापेक्षा लढून मेलेले काय वाईट'..आणि सूर्याजीच्या या शब्दांनी चमत्कार केला.सारे मावळे माघारा फ़िरले.युद्धाचे पारडे फ़िरले,राजपुतांचेही नशीब फ़िरले.आता मावळ्यांचा आवेश विलक्षण होता. सुभेदारांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता.महाराजांच्या समोर खाली मानेने नव्हे तर ताठ मानेने मिरवायचे होते. मग काय विचारता? पुनः हातघाईची लढाई,पुनः तोच आवेश,तेच मावळे..फ़क्त तानाजीविना..

काही वेळातच युद्धाचा निकाल लागला. राजपूतांनी मराठी रक्तासमोर शरणागती पत्करली.मावळ्यांनी गड खेचून आणला होता. सूर्याजीच्या जादूई शब्दांनी कमाल केली होती. गडावर गवताच्या गंज्या पेटवल्या गेल्या.आता तमा नव्हती अंगावरील जखमांची, की सांडलेल्या रक्ताची..हे रक्त आमच्या शिवाजी राजाच्या पायाशी,स्वराज्याच्या कामी आले हेच महत्वाचे..गडावर सांडलेल्या मराठी रक्ताची किंमत कोहीनूरपेक्षाही कितीतरी मोठी..कितीतरी मोठी..काय कौतुक सांगावे या मावळ्यांचे?कुठे सापडतात अशी माणसे?आम्हाला केव्हा मिळतील ही माणसे?पण मिळतील का तरी?की फ़क्त आम्ही इतिहास वाचायचा आणि रंगवून सांगायचा?खरंच सापडतील का हो ही माणसे आज?या पृथ्वीवर?की आणखी कुठ?