Monday, August 8, 2011

प्रेमविवाह....

'मला वाटले नव्हते तू असा/अशी निघेल', हे शब्द आहे एका प्रेमविवाह करनाऱ्या जोड्प्यांचा. हे असे काय अनपेक्षित घडले की एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे प्रेमी लग्न झाल्यानंतर निराश होतात? का नकोसा वाटतो एकमेकांचा सहवास? प्रेमविवाह की ठरवून केलेले लग्न यामध्ये कोण यशस्वी होते. हा एक वाद आहे. असे नाही की प्रेमविवाह हे सगळेच यशस्वी होतात. काही विफल ही होतात. तर चला आपण अवलोकन करुया की का प्रेमविवाह अयशस्वी होतात.
प्रेम करने आणि लग्न यात खुप फरक आहे. लग्न केले की रोज एकत्र रहाणे आलेच. आधी केलेले वादे सदैव पूर्ण होतात असे नाही. लग्नानंतर फिरने, मौजमज्जा करने याला थोड़े बंधन येतात. लग्नापूर्वी कित्येक वर्षे एकमेकांना ओळखणारी जोडपीही लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी एकमेकांच्या स्वभाव, आवडीनिवडींविषयी वाद घालताना दिसतात. अर्थात सगळ्याच वादांचे रूपांतर घटस्फोटात होते असे नाही. प्रेमविवाहात मात्र पहिल्यापासूनच "मी असा आहे' किंवा "मी अशी आहे, हे तुला माहीतच आहे,' अशा प्रकारे सुरवात होते. त्यामुळे जुळवून घेईपर्यंत थोडे जपून राहण्याऐवजी पहिल्यापासूनच चौफेर फलंदाजी सुरू होते.
कुटुंबाचा किंवा त्यातल्या कोणाचातरी त्या लग्नाला ठाम विरोध हा एक खुप मोठा गहन प्रश्न असतो. त्यात जर नवरा बायकोचे वाद झाला की तेल ओतायला यांना कोणी सांगायची गरज नसते. "बघ, तुला आधीच सांगत होतो, नको करूस म्हणून,' असा सूर लावतात. अशा वेळेला कुटुंबाची गरज असतानाही त्यांची मदत मिळत नाही. अर्थात यात महत्त्वाचा ठरतो, तो एकमेकांवरचा विश्वास. आता पहा काही भिन्न आर्थिक, सामाजिक परिस्थिती, वेगवेगळे धर्म, देश असलेली जोडपीदेखील अत्यंत यशस्वीरीत्या संसार करताना दिसतातच ना? या मागे असतो त्यांचा एकमेकांवरिल अतूट विश्वास. प्रेमविवाहात एकमेकांकडून ही जोडपी अवास्तव अपेक्षा ठेवतात, नाही तर हे नेहमीच घडते. कारण आपण प्रेमात पडणे म्हणजे आपल्या जोडीदाराकडून काही अपेक्षा ठेवणं आपला हक्कच आहे, अस त्यांना वाटतं. प्रेमविवाह केलेली जोडपी एकमेकांबरोबर जणू फुटबॉल खेळत असतात. ज्यांचा गोल होईल त्याचा अर्थातच विजय असतो, आणि दुसऱ्याचा अपमान किंवा भावना दुखावण्याचा प्रकार असतो. ‘मला काय वाटतं, हे जाणून घ्यायची गरज तुला वाटली नाही’, ‘असले बेचव जेवण मी जेवू शकत नाही’, ‘माझ्या आई-वडिलांविषयी तु असं बोलतेस/बोलतोस?’ अशा उद्गारांनी दुसऱ्याचा अपमान केला जातो. यामुळे दुसरा जोडीदार पहिल्याचा याहुनही अधिक अपमान कसा करता येईल, याचा विचार करु लागतो. जर नवरा अहंपणा जपणारा किंवा बायको वर्चस्व गाजवणारी असेल तर हे वारंवार घडतं. दुसरा जोडीदार पहिल्याचा अपमान करण्याची एकही संधी वाया घालवत नाही. हा खेळ असाच चालत राहतो, आणि शेवटी त्याचं रुपांतर घटस्फोटात होतं. म्हणूनच पती-पत्नी एकमेकांना दुखावण्याचं आवर्जून टाळायला हवे आणि समजा, कधी दुखावलं तर आपला ’अहं’ बाजूला सारून जोडीदाराची माफी मागायला हवी.
प्रेमात पडलेल्या व्यक्तिंना एकमेकांविषयी वाटणारे आकर्षण हेचं प्रेमात पडण्याचं मोठं कारण असतं. दोघाच्याही भिन्न व्यक्तिमत्वाकडे परस्परांचं लक्ष नसतं. विवाहानंतर या व्यक्तिमत्वांची खरी ओळख पटते, आणि मतभेदांना सुरुवात होते. बऱ्याचदा घटस्फोटाचे कारण जोडप्यांच्या व्यक्तिमत्वातील प्रचंड तफावत किंवा कमालीचे साम्य हेही असू शकतं. उदा. जोडप्यामधील एकजण बोलका, मनमिळावू सगळ्यात मिळून मिसळून राहणारा, स्वत:च्या भावना व्यक्त करणारा असेल आणि दुसरा अबोल, दुसऱ्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त न करणारा, त्यांच्याबद्द्लचे अपले प्रेम, जिव्हाळा न दाखवणारा असेल तर यामुळे त्या जोडप्यात मतभेद होऊ शकतात. त्याचबरोबर आळस विरूध्द उत्साह, विश्वास विरूध्द संशय, अंतर्मुखता विरूध्द बहीर्मुखता वगैरे सारखे स्वभावविशेष विवाह मोडण्यास कारणीभूत ठरतात. पती-पत्नी दोघेही वर्चस्व गाजवणारे, रागीट, संशयी किंवा एकमेकांवर अवलंबून राहू पाहणारे असतील, तरीही त्यांच्या नात्यात समस्या निर्माण होतात.थोडक्यात, स्वप्नात जगण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेऊन जर पती-पत्नींनी आपल्या संसाराचं सारथ्य केलं तर कुठलाही प्रेमविवाह अपयशी ठरणार नाही. विवाहापुर्वी एकमेकांची खरी ओळख पटवून घेणं म्हणूनच आवश्यक असतं.विवाह करण्यापूर्वी परस्परांनी समजून घेऊन, एकमेकांचा स्वीकार करावा म्हणजे भविष्यातील गैरसमजुती आपोआप नाहीशा होतील.घटस्फोटाच्या काटेरी मार्गावरून जावे लागणार नाही. म्हणूनच लग्नाआधीचे प्रेम असो वा नसो, ते लग्नानंतरही कायम राहिले म्हणजे झाले!

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...