Monday, August 8, 2011

सोहनी-महिवालच्या प्रेमाची कहाणी

पंजाबच्या चिनाब नदीच्या काठी एका गावात कुंभार समाजात सोहनी नावाचे रत्न जन्माला आले. सोहनी अतिशय सुंदर होती. त्याचवेळी एका मोगल व्यापार्‍याच्या घरी इज्जत बेग याने जन्म घेतले. पुढे हाच सोहनीचा प्रियकर महिवाल म्हणून ओळखला जाऊ लागला. या दोघांच्या प्रेमाची कहाणी आज फक्त पंजाबातच नव्हे, तर देशभरात प्रसिद्ध आहे.

इज्जत बेगला फिरण्याचा खूप शौक. त्याने आपल्या वडिलांची परवानगी घेऊन देश फिरण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत त्याचे मन रमले नाही. मग तो लाहोरला गेला. तिथेही तो लवकरच कंटाळला. मग आपल्या घरी परतण्याचे त्याने ठरविले. रस्त्यातच तो गुजरातमध्ये एके ठिकाणी थांबला. तिथे त्याने सोहनीला पाहिले. तिला पाहिले आणि तो सर्व काही विसरला. तो तिच्या प्रेमात एवढा वेडा झाला की त्याने तिच्या घरी जनावरे पाळण्याची नोकरी पत्करली. पंजाबमध्ये म्हशींना माहिया म्हणतात. त्यामुळे म्हशींना चरायला नेणारा तो महिवाल. म्हणून त्याचे नाव महिवाल पडले. महिवाल अतिशय सुंदर होता. महिवाल व सोहनी दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले.


पण सोहनीच्या आईला ही बाब कळली तेव्हा तिने सोहनीलाच फटकारले. पण त्याचवेळी सोहनीने महिवाल मूळ एका व्यापाराचा मुलगा आहे आणि तो केवळ आपल्यावरील प्रेमाखातीर जनावरे चारतो, हे आईला सांगितले. शिवाय त्याच्याशी लग्न न झाल्यास आपण जीव देऊ असा इशाराही तिने दिला. सोहनीच्या आईने महिवालला घरातून हाकलून दिले. महिवाल जंगलात जाऊन सोहनीच्या नावाने रडू लागला. इकडे सोहनीची अवस्थाही काही वेगळी नव्हती. पण तिच्या विरोधाला न जुमानता तिचे लग्न इतर कुणाशी तरी करून देण्यात आले. पण सोहनीला ते अजिबात मान्य नव्हते.

इकडे महिवालने आपल्या रक्ताने लिहिलेली एक चिठ्ठी सोहनीला पाठवली. ती वाचून सोहनीने त्याला उत्तर दिले, मी तुझीच आहे आणि तुझीच राहीन. त्यानंतर मग महिवालने साधूचा वेष धारण करून सोहनीच्या घरी गेला. दोघांच्या भेटी होऊ लागल्या. पुढे सोहनी मातीच्या मडक्याच्या आधारे नदी पार करून महिवालला भेटायला जायची. दोघेही प्रेमरत अवस्थेत तासंतास बसायचे. ही बाब सोहनीच्या वहिनला कळली. तिने मातीच्या पक्क्या मडक्याऐवजी कच्चे मडके ठेवले. सोहनीला ही बाब कळली. पण प्रियकरातूर सोहनी ते मडके घेऊन नदीत उतरली. पण अखेरीस ते मडके फुटले आणि ती पाण्यात बुडून मरण पावली. इकडे महिवाल तिची वाट बघत बसला. पण सोहनीचा मृतदेह त्याच्या पायाला लागला तेव्हा त्याला वस्तुस्थिती कळली. आपल्या प्रेयसीचा मृत्यू झाल्याचे कळताच तो वेडा झाला. त्याने सोहनीला आपल्या बाहूपाशात घेऊन नदीत उडी मारली.


सकाळी मच्छिमारांनी माशांसाठी जाळे टाकले, त्यावेळी जाळ्यात त्यांना सोहनी व महिवालचे परस्परांना बाहूपाशांत घेतलेले मृतदेह मिळाले. गावकर्‍यांनी त्यांच्या प्रेमाचे एक स्मारक बांधले. या स्मारकाला हिंदू लोक समाधी व मुस्लिम लोक मजार म्हणतात.

अर्थात असे असले तरी प्रेम हे प्रेमच असते त्याला धर्म, जातीचे बंधन नसते, हेच खरे.

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...