Monday, August 8, 2011

प्रेमविवाह ....

अनुप आणि सुमन एकमेकांसाठी अक्षरश: वेडे झाले होते! कॉलेजमध्ये असताना त्यांची भेट झाली होती. एकमेकांना पाहताक्षणी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मग काय, एकमेकांच्या डोळ्यांत पाहत मोठमोठी प्रेमपत्रं लिहिण्यात, एकमेकांसाठी उसासे टाकण्यात कॉलेजचे दिवस कसे भुर्रकन्‌ उडाले ते कळलंच नाही. यथावकाश दोघांनी लग्न केलं. सुरूवातीचे काही दिवस आपल्याच इंद्रधनुषी विश्र्वात गुरफटलेल्या या प्रेमीजीवांकडे पाहून कुणालाही हेवा वाटला असता.

पण हळुहळू आपल्या जोडीदाराकडून आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत हे त्यांच्या ध्यानात येऊ लागले. एकमेकांचे दोष ठळकपणे दिसू लागले. आपला जोडीदार आपण समजतो तसा नाही हे समजू लागले. प्रेमाचे रंग उडून जाऊ लागले. मग दोघे एकमेकांवर चिडू लागले, रोज वादावादी, भांडणे अखेर घटस्फोटापर्यंत वेळ आली.


अनेक प्रेमविवाहांची अखेर शेवटी अनुप आणि सुमन यांच्यासारखी घटस्फोटातच होते. गंमत म्हणजे ठरवून केलेल्या विवाहापेक्षा प्रेमाच्या आणाभाका घेऊन केलेली लग्ने अधिक प्रमाणात मोडतात, याची कारण काय असावीत?


अलीकडे प्रेमविवाह करण्यास अधिक प्राधान्य दिले जाते. चित्रपट, दूरदर्शन, कादंबया (उदा. मिल्स अँड बून) नाटके यातून प्रेमात आकंठ बुडालेले नायक - नायिका आणि त्यांचा राजा - राणीचा संसार पाहून अनेकांना आपणही प्रेमात पडावे आणि विवाह करून सुखी व्हावे असे वाटते.


खरे तर ठरवून केलेल्या विवाहापेक्षा प्रेमविवाह अधिक टिकतात. अशी एक समजूत आहे. कारण ठरवून केलेल्या विवाहात एका अनोळखी माणसाबरोबर तुम्हाला संपूर्ण आयुष्य घालवायचे असते. त्यामुळे त्याच्याबरोबर पटेल की नाही, अशी एक भीती मनात असते. प्रेमविवाहात आपल्या जोडीदाराला आपण पूर्वीपासून पूर्णपणे ओळखत असल्याचा एक भ्रम आपल्या मनात असतो. जेव्हा एकमेकांविषयीची खरी ओळख (म्हणजे लग्न झाल्यापासूनची) होऊ लागते.


एकमेकांकडे पाहून आकर्षित होण्याव्यतिरिक्त प्रेमात पडण्याची इतरही काही कारणं असतात. काही वेळा जोडीदाराला त्याच्या कुटुंबियांकडून प्रेम, जिव्हाळा मिळालला नसतो. अशावेळी त्याला किंवा तिला आपल्या प्रोत्साहन द्यावे अशी एक जबरदस्त इच्छा जोडीदाराच्या मनात असते.


एखाद्या व्यक्तीला स्वत:विषयी विश्र्वास नसतो. कधी कधी त्या व्यक्तीच्या मनात स्वत:विषयी न्यूनगंड असतो. अशा वेळी आपल्या प्रेमात कुणी पडले आहे ही भावनाच त्याला अथवा तिला उत्तेजित करणारी असते आणि मग अशा व्यक्ती सहज प्रेमात पडतात.


आयुष्याला कलाटणी देणारी एखादी घटना घडते, त्यावेळी अनेकजन प्रेमात पडतात. पालकांचा मृत्यू, एखादा गंभीर आजार, नोकरीधंद्यात आलेले अपयश, कौटुंबिक समस्या वगैरे, अशी प्रेमात पडण्याची काही कारणे आहेत.


स्त्री जेव्हा समोरच्या पुरूषात आपल्या पित्याला आणि पुरूष समोरच्या स्त्रीत आपल्या आईला पाहतो तेव्हा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात, असे अनेक मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. एखादीचा पिता कुटुंबात वर्चस्व गाजवणारा, आक्रमक आणि चंचल वृत्तीचा असे तर असे स्वभाव विशेष असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. अर्थात प्रेमात पडणारे कोणतीही व्यक्ती अशा व्यक्तीच्या प्रेमात ठरवून पडत नाही, तर त्याच्या नकळतच हे घडत असतं.


प्रेमविवाह मोडण्याची अनेक कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचं आणि सर्वत्र आढळून येणारं कारण म्हणजे प्रेमात पडलेलं जोडपं आपल्या जोडीदाराविषयी भलभलत्या कल्पना बांधून असतं. त्याच्याकडून ती अवास्तव अपेक्षा ठेवते. वास्तवतेची जाणीव ते ठेवत नाहीत. प्रेमात पडलेल्या व्यक्ती नेहमीच एकमेकांना आपल्या उत्कृष्ट वागणुकीनं प्रभावित करण्याचा प्रयत्‍न करीत असतात. आपली चांगली बाजू दाखवण्याचा ते जाणूनबुजून प्रयत्‍न करतात. दिसण्यात, पेहरावात, बोलण्यात, आपण चांगले कसे दिसू याकडे त्यांचं अधिक लक्ष असतं.


सुरुवातीच्या काळात हे चित्र अल्हाददायक असतं. आपल्या जोडीदाराचे दोष, अवगुण याच्याकडे सहजपणे दुर्लक्ष केलं जातं. आता बी. सिंगचंच उदाहरण पहा. तो मद्यपी, अतिशय भावनाशील आणि रागीट आहे. त्याच्या पत्‍नीला लग्नापूर्वी याचे हे सगळे स्वभावदोष माहीत होते. त्यांच्या सकटच तिनं त्याला स्विकारलं होतं.


लग्नानंतर तो हळुहळू सुधारेल अशी तिची अपेक्षा होती आणि त्यानंही तिला आपण नक्‍की सुधारु अस अश्वासन दिलं होतं. पण बी. सिंगला सुधारायचं नव्हतं. लग्नानंतर आपली बायको हळुहळू ऍडजस्ट करायला शिकेल, अस त्याला वाटत होतं. लग्नानंतर असे मतभेद वादावादीला कारणीभूत ठरतात. आणि त्याची परिणती अखेर घटस्फोटात होण्याची शक्यता असते. म्हणूनच लग्नापुर्वीच आपल्या विषयीची सर्व माहिती मोकळेपणी जोडीदाराला सांगणं आवश्यक ठरतं. म्हणून आपन कसे आहोत, आपल्या आवडी-नावडी, स्वभाव या सगळ्याविषयी आपल्या जोडीदाराला मोकळेपणी सांगा.


प्रेमविवाह मोडण्याचं दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे अनेकदा जोडपी एकमेकांना गृहीत धरतात. आपण काही बोलल्याशिवाय आपल्या जोडीदारानं आपल्याला समजून घेतलं पाहिजे, अशी त्यांची काहीशी अपेक्षा असते. अनेक वेळा आपण नवरोजींची आपल्या बायकोविषयीची शेरेबाजी ऐकतो. ’आम्ही एकमेकांना इतकी वर्षे ओळखतो, आतापर्यंत तिला माझ्या आवडी - निवडी माहीत व्हायला हव्यात. मी ऑफिसमधून उशिरा घरी आलो तर तिनं ते समजून घ्यायला हवं, मी तिच्यावर अजून प्रेम करतो, हे तिला समजायला हवं’ ही किंवा अशीच शेरेबाजी. मात्र नवरोजी ही गोष्ट लक्षात घेत नाहीत की दुसऱ्यान मन ओळखण्याची कला प्रत्येकाकडे असतेच असे नाही.


एकमेकांकडून ही जोडपी अवास्तव अपेक्षा ठेवतात, प्रेमविवाहात तर हे नेहमीच घडते. कारण आपण प्रेमात पडणे म्हणजे आपल्या जोडीदाराकडून काही अपेक्षा ठेवणं आपला हक्‍कच आहे, अस त्यांना वाटतं. प्रेमविवाह केलेली जोडपी एकमेकांबरोबर जणू फुटबॉल खेळत असतात. ज्यांचा गोल होईल त्याचा अर्थातच विजय असतो, आणि दुसऱ्याचा अपमान किंवा भावना दुखावण्याचा प्रकार असतो. ‘मला काय वाटतं, हे जाणून घ्यायची गरज तुला वाटली नाही’, ‘असले बेचव जेवण मी जेवू शकत नाही’, ‘माझ्या आई-वडिलांविषयी तु असं बोलतेस/बोलतोस?’ अशा उद्‍गारांनी दुसऱ्याचा अपमान केला जातो.


यामुळे दुसरा जोडीदार पहिल्याचा याहुनही अधिक अपमान कसा करता येईल, याचा विचार करु लागतो. जर नवरा अहंपणा जपणारा किंवा बायको वर्चस्व गाजवणारी असेल तर हे वारंवार घडतं. दुसरा जोडीदार पहिल्याचा अपमान करण्याची एकही संधी वाया घालवत नाही. हा खेळ असाच चालत राहतो, आणि शेवटी त्याचं रुपांतर घटस्फोटात होतं. म्हणूनच पती-पत्‍नी एकमेकांना दुखावण्याचं आवर्जून टाळायला हवे आणि समजा, कधी दुखावलं तर आपला ’अहं’ बाजूला सारून जोडीदाराची माफी मागायला हवी.


प्रेमात पडलेल्या व्यक्तिंना एकमेकांविषयी वाटणारे आकर्षण हेचं प्रेमात पडण्याचं मोठं कारण असतं. दोघाच्याही भिन्न व्यक्तिमत्वाकडे परस्परांचं लक्ष नसतं. विवाहानंतर या व्यक्तिमत्वांची खरी ओळख पटते, आणि मतभेदांना सुरुवात होते. बऱ्याचदा घटस्फोटाचे कारण जोडप्यांच्या व्यक्तिमत्वातील प्रचंड तफावत किंवा कमालीचे साम्य हेही असू शकतं. उदा. जोडप्यामधील एकजण बोलका, मनमिळावू सगळ्यात मिळून मिसळून राहणारा, स्वत:च्या भावना व्यक्त करणारा असेल आणि दुसरा भिडू अबोल, दुसऱ्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त न करणारा, त्यांच्याबद्‍द्लचे अपले प्रेम, जिव्हाळा न दाखवणारा असेल तर यामुळे त्या जोडप्यात मतभेद होऊ शकतात. त्याचबरोबर आळस विरूध्द उत्साह, विश्वास विरूध्द संशय अंतर्मुखता विरूध्द बहीर्मुखता वगैरे सारखे स्वभावविशेष विवाह मोडण्यास कारणीभूत ठरतात. पती - पत्‍नी दोघेही वर्चस्व गाजवणारे, रागीट, संशयी किंवा एकमेकांवर अवलंबून राहू पाहणारे असतील, तरीही त्यांच्या नात्यात समस्या निर्माण होतात.


थोडक्यात, स्वप्नात जगण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेऊन जर पती - पत्‍नींनी आपल्या संसाराचं सारथ्य केलं तर कुठलाही प्रेमविवाह अपयशी ठरणार नाही. विवाहापुर्वी एकमेकांची खरी ओळख पटवून घेणं म्हणूनच आवश्यक असतं. विवाह करण्यापूर्वी परस्परांनी समजून घेऊन, एकमेकांचा स्वीकार करावा म्हणजे भविष्यातील गैरसमजुती आपोआप नाहीशा होतील. घटस्फोटाच्या काटेरी मार्गावरून जावे लागणार नाही.

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...