Wednesday, May 8, 2013

त्याच शपथा, तीच वचने, भूलथापा अन् बहाणे त्याच शस्त्रांचे पुन्हा या काळजावर वार झाले

वादळाशी झुंजले ते मोडले अन ठार झाले

धावले त्याच्यासवे ते काय त्याला ’प्यार’ झाले?

मत्सराने डाग पडले बघ शशीवर कृष्णवर्णी
हे तुझे स्मितहास्य सखये लाघवी हत्यार झाले

त्याच शपथा, तीच वचने, भूलथापा अन् बहाणे
त्याच शस्त्रांचे पुन्हा या काळजावर वार झाले

जानकी वा याज्ञसेनी प्राक्तनाशी हारलेल्या
स्त्रीत्व त्यांचे का स्वतःच्या मस्तकीचा भार झाले?

बास आता....., वैध ठरवा भ्रष्ट माझे वागणेही
रामशास्त्र्यांच्या युगाचे लाड आता फार झाले

का मनस्वी शायराने या जगी बदनाम व्हावे
सभ्यतेच्या मंदिरीही का कमी अपहार झाले

शोधतो आहे कधीचा गाव स्वप्नातील माझ्या
की जिथे असतील परके तेवढे परिवार झाले

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...