Wednesday, May 8, 2013

त्या तनूला सत्य कैसे, स्वप्न का ना मानता

जे दिसे प्रत्यक्ष सारे त्या भ्रमाला जाणता,

वेगळे मी स्वप्न खोटे का पहावे झोपता...

का उद्याची झोकुनी ग्वाहीच देती बावळे,
नष्ट हो एका क्षणी जे काळ त्यांचा कोपता...

धर्म किंवा नीतिच्या का सांगती गप्पा कुणी,
जे दयेचे कर्म केले, गर्व त्याचा दावता...

त्यागवैराग्यास सांगे थोर, त्याची भाषणे
द्रव्यशुल्काने सुरू हो, दक्षिणेने सांगता...

बौद्धिकाचा आव मोठा पुस्तकी विद्येमुळे,
चामडीला का बचावी संकटाला पाहता...

छद्म प्रेमाची दुकाने लागली चोहीकडे,
आटते ते प्रेम कैसे स्वार्थ त्यांचा संपता...

रात्र होता जी विरूनी जाय, जाणीवेत ना,
त्या तनूला सत्य कैसे, स्वप्न का ना मानता...


---------------------------------------------------------

ऊन्ह तापे रे दुपारी, चालणे टाळायचे का,

फूल कोमेजून गेले, ते तरी माळायचे का?

धान्य कोठारात नासे, पोखरूनी कीड लागे,
हाय, पैसा वाचवाया जोंधळे चाळायचे का?

वाघबच्चा अंगणी ये, वाट त्याला सापडेना,
जीव लावाया दयेने पोसुनी पाळायचे का?

चूल पेटेना कशीही, लाकडे ओली म्हणूनी,
चंदनाचे खोड आहे कोरडे, जाळायचे का?

कोण मोठा धाकटा रे, शिक्षणाने वा पदाने,
मोल पैशाने करूनी माणसा टाळायचे का?

लौकिकाचा मोह वेडा, या जगाला जिंकण्याचा,

दैव नाही साथ द्याया, खंगुनी वाळायचे का?

देव भावाचा भुकेला, त्यास प्रेमाने भजावे,
उग्र कष्टाने तनूला वावगे पोळायचे का?

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...