Saturday, September 29, 2012

क्षण कधीच आपले नसतात...


क्षण कधीच आपले नसतात, ते असतात निष्ठूर
गुंतवतात आपल्या मनाला अन निघून जातात दूर
 क्षण कधीच आपले नसतात...
क्षण कधीच आपले नसतात, ते असतात मग्रूर
क्षणातल्या जीवनाला, जीवनातला क्षण बनवून
भिरकावून देतात दूर,
क्षण कधीच आपले नसतात....
क्षण कधीच आपले नसतात, तेच असतात क्षणभंगुर
फुलपाखरांसारखे  बोटांवर रंग ठेऊन निघून जातात दूर
क्षण कधीच आपले नसतात...

खरच, अगदी कुठलाही क्षण , 'आता मी येतोय' असे सांगून येत नाही. अन जेव्हा तो निघून जातो तेव्हाच तो आपल्याजवळ  होता ये लक्षात येते . पण काय करणार तोपर्यंत तो निघून गेला असतो खूप दूर 
कधीही परत न येण्यासाठी..!
नाही म्हणायला, काही क्षण आपल्याजवळ परत येतात आठवणी घेऊन. पितरांची आठवण व्हावी म्हणून आपण श्राद्ध घालतो ना , तसेच हे परत येणारे क्षणही त्या 'कोणे एके वेळी' जगलेल्या क्षणाची आठवण करून देण्यासाठी जणू श्राद्ध घालायलाच येतात. 
येणारा क्षण हा मुळी परतीचे तिकीट काढूनच येतो. मुठीत धरलेली वाळू ज्या प्रमाणे कणाकणाने निसटते अगदी असेच क्षणांचे होते. थोर लेखक व पु काळे या फसव्या क्षणांबद्दल म्हणतात  - " सौख्याचा कोणता क्षण चिरंजीव झालाय? आठवणी या कधीच सुखद नसतात . मग त्या दुखाच्या असोत व सुखाच्या. दुखाच्या असतील तर त्या पायी वाया गेलेला भूतकाळ आठवतो  अन त्या आठवणी जर सुखाच्या असतील तर ते सुखद क्षण 'निसटले' म्हणून त्रास!"  वपुंचे हे शब्द माझ्या म्हणण्याला कितीतरी बळ  देऊन जातात.
काय गम्मत आहे बघा आपल्याला हवा तो क्षण यायला सुद्धा मध्ये काही क्षणच जाऊ द्यावे लागतात. 
क्षणांच्या तोलामोलाचे दस्तुरखुद्द क्षणाच असतात.
क्षण हे झरयातल्या पाण्या सारखे असतात सतत प्रवाही ! येणारा प्रत्येक क्षण निर्मल व अस्पर्शित ! बोला या क्षणात काय करणार असा बाळबोध प्रश्न घेऊनच जणू प्रत्येक क्षण येत असतो. मात्र आपण कपाळ करंटे , येणाऱ्या क्षणाटली कोवळीक व आगळीक आपण ओळखूच शकत नाही.
खरे तर येणारा प्रत्येक क्षण हा संस्कारक्षम अंकुर घेऊन येत असतो, त्या क्षणात नवनिर्मितीची बीजे ठासून भरलेली असतात. गरज असते ती हे कोवळे अंकुर जगवण्याची. या संदर्भात लेखक प्रवीण दवणे  यांचे विचार मार्गदर्शक ठरावेत. ते म्हणतात ---
" कधी कधी उगाचच निर्माण केलेल्या वैतागाने त्या त्या वेळी बिलगु पाहणारे कोवळे क्षण रुसून माघारी निघून जातात अन त्याचेच खरे प्रश्न जोतात. उगवतील न उगवतील माहित नसत पण आपण आनंदाच्या बिया पेरीत राहावं. क्षणही कुठेतरी 'भिजत' पडलेला असतोच तो रुजून येण्याची त्याची त्याची एक वेळ असते. आपण मस्तपैकी आनंदाच्या बिया पेरीत रहाव्या !"
त्यामुळे शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की फार उमेदीने येणाऱ्या 'भविष्यातील' क्षणाला, 'वर्तमानातील' आपल्या 'स्वागतोत्सुक' मनाने  आपण अविस्मरणीय असा 'भूतकाळ' निश्चितच देऊ शकतो.  
तर मग चला,  
नवकल्पनांचे स्फुल्लिंग हाताशी धरून येणाऱ्या क्षणांना साद घालूया, 
अगदी 'आतून' आणि जीव ओतून . 
मग क्षणही असेलच तिथे  शिंपल्यातील मोत्याप्रमाणे  आपल्या मनाचा कप्पा व्यापून घेण्यासाठी टपून बसलेला !

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...