Friday, September 28, 2012

शेवट दोघांच्या मनासारखा झाल, यातच मोठं समाधान आहे...

पहिलं हे पहिलंच असतं, असा आपण वारंवार उल्लेख करतो. कारण पहिल्याचं महत्त्व आपण जाणतो. तर चला पहिल्या प्रपोजचा थोडा अनुभव घेऊ या.

एव्हाना त्यांची मैत्री वर्गातल्या बाकापासून कॅंटीनच्या बेंचपर्यंत आली होती. अर्थात त्यासाठी मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात कॅंटीनचा कडवट चहा गळ्याखाली ढकलण्यासाठी काही तरी कारण अकारण पुढे करावे लागत असे. मग गप्पा-गोष्टी आणि टिंगलटवाळकीच्या निमित्तानं एकमेकांशी एखाद-दुसरा संवाद साधला जाई, तर कधी कधी वादविवाद झडे. असे दिवसांमागून दिवस जात होते. तो आज "प्रपोज' करील, उद्या करील, परवा करील, अशा भाबड्या आशेला कुरवाळत ती येणारा प्रत्येक दिवस ढकलत होती. पण "तो' सोन्याचा दिवस काही केल्या उगवत नव्हता. तशीच मनाची घालमेल काही केल्या शमत नव्हती. शेवटी भावनात्मक कोंडी फोडण्यासाठी तिने स्वतःच "प्रपोज' करण्याचा चाकोरीबाहेरचा आणि अत्यंत धाडसी निर्णय घेतला.

तसेही ती काही अशोकाचं झाड नव्हती; ज्याला फूलही नाही, सावलीही नाही की फळंही नाही! एकविसाव्या शतकातील मुलीने स्वतःला व्यक्तच करू नये, हे शक्‍य तरी आहे काय! तशीही ती स्वभावाने खूप नम्र आणि संकोची मुलगी नव्हती. मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी एका दिव्यातून जावे लागेल, याचा तिला पुरेपूर अंदाज होता. त्यासाठी मनाची पक्की तयारी केली होती. "कल करे सो आज, और आज करे सो अब,' या उक्तीप्रमाणे तिने उद्याच प्रपोज करण्याचे ठरविले.

पहिल्या अर्थात पहिल्या आणि शेवटच्या प्रपोजची मनात थोडी धाकधूक होतीच. तो "हो' म्हणेल की ..!' याचा राहून-राहून मनात विचार येत होता. गुलाबाच्या पाकळ्या तोडून झाल्या, गणिताच्या वहीची पानं मोजून झाली, तरी विश्‍वासक आणि थोडे आश्‍वासक उत्तर काही सापडेना. शेवटी थेट त्याच्यासमोर जाऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. पण तिला पठडीबाज प्रपोज करायचे नव्हतं. काही तरी वेगळं करण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती.

त्यामुळे थेट, पण थोड्या वेगळ्या धाटणीच्या प्रपोजचा सराव करण्याचा विचार मनात डोकावला. रात्री बळेबळे चार घास खाऊन ती आपल्या खोलीत गेली. दार बंद करून आरशासमोर पंधरा-वीस वैविध्यपूर्ण प्रपोज मारले. त्यांतील एका वाक्‍याचा दुसऱ्याशी अर्थाअर्थी संबंध नव्हता. प्रपोजमध्ये थोडी सुसूत्रता येण्यासाठी जे म्हणायचे आहे, ते नीट लिहून परत सराव केला. तरीही समाधान झाले नाही. प्रपोज सत्राच्या मध्यंतरी थोडा विरंगुळा म्हणून आकाशाला हात टेकवून एक-दोन गाण्यांच्या मधुर चालींवर पाय थिरकायचे. सर्व करून झाले; पण त्याला थेट प्रपोज करण्याची हिंमत नसल्याची तिला सारखी जाणीव होत होती. त्यापेक्षा प्रेमपत्र लिहून भावना व्यक्त करणे जास्त सोईस्कर वाटले. त्याने तिची गणिताची वही मागितलेली होतीच. उद्या ती देताना त्यात प्रेमपत्र ठेवण्याचा बेत तिने रचला. पत्राच्या प्रस्तावनेतच सकाळचे तीन वाजले; नंतर चारचा अर्धा ठोकाही पडला. शेवटी मोजून चार ओळीचे; पण भावनांनी ओतप्रोत भरलेले पत्र फायनल केले. ते सहज दिसेल अशा जागी वहीत लपवून ठेवले.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बागेतले एक ताजे, टवटवीत गुलाबाचे फूल पत्राच्या शेजारी ठेवले. पहिले दोन तास संपल्यानंतर सर्व विद्यार्थी व्हरांड्यात जमा झाले. ती त्याचा जवळ जाऊन म्हणाली, ""मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे.'' तो म्हणाला, ""मलाही!'' दोघेही कॅंटीनच्या बेंचवर थोडे अवघडलेच. काय बोलावे ते दोघांनाही कळेना. या गोंधळातच तो तिला थेट म्हणाला, ""तुझे माझ्यावर प्रेम आहे?'' ती थोडी दचकलीच. अंगावर पाल पडावी तशी ती चटकन "नाही' म्हणाली. असे काही घडण्याचा तिने विचारही केलेला नव्हता. थोडे सावरून तिने प्रतिप्रश्‍न केला, "तुझे आहे काय?' आता तिने नाही म्हटल्यावर माझे तुझ्यावर एकतर्फी प्रेम आहे, असे म्हणणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता. त्यात मैत्री गमावण्याची रिस्कही होती. पण त्याला "नाही' म्हणताच आले नाही. त्याने "लिटल बिट' म्हटले.

तिला काहीच कळाले नाही. तिने परत विचारणा केली. तर तो नजर झुकवून अपराधी भावनेने "हो' म्हणाला. तो पुन्हा पुटपुटला, ""तू विचार करून उत्तर दे ना. माझ्यासाठी थोडा वेळ घे.'' हुकमी पत्ता आपल्या हातात ठेवत ती, ""ठिकै, उद्या सांगते'' म्हणाली. वही तशीच हातात घेऊन आनंदाच्या सागरात आकंठ बुडालेल्या मनाने वर्गात परतली. त्याच्याप्रमाणेच तिलाही काही तरी "महत्त्वाचे' सांगायचे होते, याचा त्याला पुरता विसरच पडला.

प्रेम हे प्रेम असतं...'

रात्रीची नीरव शांतता. तो आपल्या खोलीत कॉटवर पाय दुमडून गाढ विचारात बसलाय. भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय. तास सरला की ठोक्‍यांच्या कर्कश आवाजाने त्यांची तंद्री भंगते, ती काही क्षणांसाठीच. पुन्हा तो विचारांच्या दरीत लोटला जातो. आपोआप. भावना व्यक्त केल्याचं समाधान चेहऱ्यावर दिसत असलं तरी ती "हो' म्हणेल की "...' हा प्रश्‍न त्याला छळतोय. ""मुलीसुद्धा ना... एक "हो' किंवा "नाही' म्हणायला किती वेळ घेतात. दुसऱ्याची परीक्षा घेण्यात यांना फारच आवडतं. आमचा येथे जीव जातो. हे त्यांना कसं कळत नाही!'' तो स्वतःशीच बडबडत होता. उद्या कॉलेजात गेल्यावर तिला थेट विचारावं, असा मनात तो पक्का निर्धार करतो.

दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला येतच नाही. तो दिवसभर कॉलेजच्या पार्किंगमध्ये तिची वाट पाहत घुटमळत असतो. पण पदरी निराशाच पडते. शेवटचा तासही सरतो. आता त्याच्या धीराचा बांध फुटतो. तो तिच्या मैत्रिणीकडून तिचा मोबाईल क्रमांक घेतो. फोन फिरवतो तर "नॉट रिचेबल.' आता काय करावे! तो हतबल होतो; पण नाउमेद होत नाही. शेवटी पडल्या चेहऱ्याने बिछान्यात गुडूप होतो. ती का आली नसेल, तिला राग तर आला नसेल ना, असे अनेकानेक प्रश्‍न मनात रुंजी घालत असतात. तिसरा दिवस उगवतो. तो पुन्हा पार्किंगमध्ये तिची वाट पाहत उभा असतो. ती येते. गाडीला पार्क करून थेट त्याच्या दिशेने सरसावते. दोघेही न बोलताच जणू पूर्वनिर्धारित प्लॅनप्रमाणे कॅंटीनला जातात. कॉलेजचा पहिलाच तास असल्याने कॅंटीनमध्ये कमालीचा शुकशुकाट असतो. दोघेही गप्प असतात. केवळ त्यांच्या हृदयाची स्पंदने नकळत संवाद साधत असतात.

ती बोलती होते. म्हणते, ""मी तुझ्या भावनांचा आदर करते. तू स्वतःला निर्भीडपणे व्यक्त केलंस, याचा हेवाही वाटतो. या वयात अशा भावना मनात येणं स्वाभाविक आहेत. त्या व्यक्त करण्यातच त्याचं फलित असतं. काही मुलं घुम्या स्वभावाची असतात. मुलगी कितीही आवडली तरी व्यक्तच होत नाहीत. मुलगी बिचारी वाट बघत बसते. शेवटी त्याच्या मनात माझ्याबाबत काही नसेल, या निष्कर्षापर्यंत येऊन पोचते. अशात एखाद्या दुसऱ्या मुलानं "प्रपोज' केलं तर त्याचा भावनांचा आदर करीत केवळ त्याच्यासाठी "हो' म्हणते. मुलीला कधी कुणाच्या भावना दुखवता येत नाहीत. एखाद्या मुलाने "प्रपोज' केल्यावर एखादी मुलगी नकार देत असेल, तर त्यामागे काही छुप्या बाबी असतात. परिस्थिती त्यांना "नाही' म्हणण्यास भाग पाडते. तू मला "प्रपोज' केलंस याचा मला सार्थ अभिमान आहे.''

ती थोडी थांबून म्हणाली, ""दोघे प्रेमात पडले, गावभर गोंधळ घातला आणि शेवटी "ब्रेकअप' झाला असं सध्या प्रेमाचं स्वरूप आहे. मला तसं करायचं असतं, तर याआधीही अनेक मुलांनी मला "प्रपोज' केलं होतं. मी त्यांनाही "हो' म्हणू शकले असते. माझा तात्पुरत्या प्रेमप्रकरणावर विश्‍वास नाही. वय उथळ असलं तरी माझ्या भावना उथळ नाहीत. "ऍलुम्नी मीट'मध्ये वर्गमित्रांनी माझ्या प्रेमाबद्दल दबक्‍या आवाजात बोलावं, हे मी कधीही सहन करू शकणार नाही. मला त्यांच्यापुढे अभिमानानं मिरवायचं आहे. केवळ आजच नाही, तर शेवटच्या श्‍वासापर्यंत.''

ती बोलत होती, ""येत्या तीन-चार वर्षांत माझ्या लग्नाची बोलणी सुरू होतील. तुझं आणि माझं वय सारखंच असल्यानं या अल्पावधीत स्वतःला सिद्ध करणं तेवढं सोपं नाही. तरीही आपण मिळून काही प्रयत्न करू. त्यासाठी माझी सर्वतोपरी साथ तुला मिळेल. मी शब्द देते. तुला कधीही एकटं सोडणार नाही. माझं वचन राहिलं. मी कुठेही कमी पडणार नाही. पण त्यासाठी हवाय तुझा जन्मभरासाठी मला साथ देण्याचा निर्धार. तो असेल तर तू माझा स्वीकार कर; अन्यथा मला फसविल्याचं पाप तुझ्या माथी लागेल. तू विचार करून उत्तर दे. मला काही घाई नाही. तू म्हणशील तोपर्यंत वाट बघण्याची तयारी आहे माझी. मला हवंय ते केवळ तुझं आश्‍वासक उत्तर. नीट विचार कर. माझ्यासाठी.''

त्याला तिचं बोलणं काही केल्या कळत नव्हतं. आता बॉल त्याच्या कोर्टात होता. ""मी उद्या सांगतो,'' असं म्हणून तो विषय संपवतो.

गुलाबी थंडीला प्रीतीची झालर!

पुन्हा एकदा रात्रीची भकास शांतता. खोलीत फक्त भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांची आणि त्याच्या हृदयाची हालचाल. बिछान्यावर पाय दुमडून तो विचार करतोय. थोड्या वेळात बाहेरच्या बोचऱ्या थंडीचं अस्तित्व खोलीतही जाणवायला लागतं. पाय झाकले जातील, तेवढंच पांघरूण घेतो. पुन्हा विचारचक्र सुरू. मणामणाचं ओझं मनावर घेऊन तळमळत बिछान्यावर थोडा पहुडतो. तरीही नजर शून्यात. अंतर्मनाचा वेध घेण्याच्या प्रयत्नात मनात एक अनपेक्षित द्वंद्व सुरू... ""एक निर्णयही किती महत्त्वाचा असतो. तुमचं आख्खं आयुष्य पालटण्याची ताकद त्यात असते.

म्हणून तो विचार करूनच घ्यावा, हे समजत असलं तरी उमगत नाही,'' तो स्वतःशीच बोलत होता. त्यानं तिला वेळ मागणं, हे वरकरणी त्याला फारच अपराधीपणाचं वाटत होतं, पण पर्याय नव्हता. आयुष्यभराच्या "कमिटमेंट'वर सहज उत्तर देणं तितकं सोपं नव्हतं. त्यातही एकदा शब्द दिला, तर त्यासाठी प्राणही गेला तरी बेहत्तर, असा त्याचा मराठी बाणा. पण शब्द देताना थोडा विचार करून निर्णय घेण्याचा त्याचा लहानपणापासूनचा स्वभाव. त्याने तिच्याकडे मागितलेल्या वेळेचं अंतर्मन समर्थन करीत होतं; पण अक्षम्य दिरंगाई होऊ द्यायची नव्हती. कारण प्रेमाच्या मैदानात मागं राहणाऱ्याची हमखास विकेट पडते, याची जाणीव होतीच. विचारांच्या अनेक फेऱ्या झाल्या; पण समाधानकारक उत्तर काही केल्या सापडेना.

त्याचं एक मन म्हणालं, ""अरे, तुझ्यावर सर्वस्व ओवाळून टाकण्याची त्या मुलीची तयारी आहे. ती तुझी आयुष्यभरासाठी साथ मागतेय. तिला केवळ टाइमपास करायचा असता, तर केव्हाच "हो' म्हणून मोकळी झाली असती, पण तसं नाही. एवढी समजूतदार मुलगी तुला शोधून सापडणार नाही. या मुलीनं तुला वास्तवाचं दर्शन घडवलं. शेवटी प्रेम हे प्रेम असतं आणि तुमचं आमचं "सेम' असतं, हेच खरं. तिला पहिल्यांदा बघितल्याबरोबर मनाने साद दिली. नुकत्याच आलेल्या एका इंग्रजी चित्रपटात दाखविलं आहे ना. परग्रहावरील प्राणी त्यांच्या वेणीसारख्या संवेदकाच्या माध्यमातून एकमेकांच्या संवेदना जाणून घेतात. आपल्याला देवाने "सिक्‍स्थ सेन्स' दिलाय. एखाद्याचे डोळे, चेहरा, स्वभाव आणि वागणूक बघून आपण आपलं मत बनवितो. यालाच दुसऱ्याच्या संवेदना, भावना जाणून घेणं म्हणतात. ती भावुक होऊन बोलत असताना प्रेमाचा साक्षात्कार होत होता आणि त्या प्रेमाच्या परतफेडीची निरागस आशा तिच्या बोलक्‍या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होती. डोळ्यांमध्ये जमलेल्या आसवांवरून ती तुझ्याबाबत किती हळवी आहे, याचा पुरेपूर अंदाज येत होता. यालाच कदाचित दोघांची "लिंक' लागणं म्हणत असावं. तसंही तू तिला बघितलं आणि ती तुला "क्‍लिक' झाली. "वुई मेड फॉर इच अदर', अशी मनाने साद दिली. ती तुझी वाट बघतेय. जा, पळत जा तिच्यापाशी.''

तर दुसरं मन म्हणत होतं, ""अरे, आई-वडिलांच्या स्वप्नांचा जराही विचार न करता एखाद्याला आयुष्यभराचं "कमिटमेंट' देणं खरंच योग्य आहे? आणि तू दिलेला शब्द पाळू शकला नाहीस तर? प्रेमात रममाण होण्यासाठी तिने तुझ्यात ऊर्मी जागविली. पण चाकोरीबाहेरचा विचार करणं फारच कठीण आहे. तिच्या निखळ, निःस्वार्थ आणि निर्मळ मनाला दुखविण्याचं दुःसाहसही तुझ्याकडून होणार नाही, हे खरं. पण जोखीम घेण्यासही मन धजावत नाही. तिच्या बोलण्यात पोरकटपणा नव्हता, तर एका समजूतदार मुलीने कोणताही आडपडदा न ठेवता परखडपणे आपलं मत मांडलं होतं. त्यामुळे तुझी भीती अनाठायी व अप्रस्तुत आहे. मात्र, विचार करून निर्णय घे. आणि एकदा विचार पक्का झाल्यावर त्यावर ठाम राहा.''

बऱ्याच विचारांती त्याने आपली मान होकारार्थी या अर्थाने हलविली आणि निर्णय घेतला. एकदम पक्का आणि झोपेच्या आहारी गेला.

दुसऱ्या दिवशी टवटवीत लाल गुलाबाचं फूल आणि तळहाताच्या आकाराची कॅडबरी घेऊन तो कॉलेजला गेला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव तिने क्षणात टिपले आणि ती कमालीची लाजली. तिच्या गालावरची गोड खळी आणखीच खुलली. त्याने दिलेल्या गुलाबाच्या फुलाचा तिनं सुहास्य वदनानं स्वीकार केला. कॅडबरी जणू हिसकूनच घेतली. तो श्‍वास रोखून बघत होता. एक शब्दही न बोलता तिने एक चिठ्ठी दिली. त्यात गुलाबाचं कोमेजलेलं फूल होतं. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्‍नांकित भाव उमटला. त्याने तिच्याकडे मान वळविली, तेव्हा ती म्हणाली, ""मी चार दिवसांआधीच चिठ्ठी लिहिली होती. तुझी थोडी परीक्षा घेतली. सॉरी. माफ कर. पुन्हा असं करणार नाही.''

तो चिठ्ठी उघडून पाहतो तर त्यात लिहिलं होतं...

चांदणी मी तुझी, चांद साक्षी नभी,
स्वामी हृदया, मी तुझी रे सखी,
नाव रे तुझे, कोरले हृदयी,
उच्चार स्मरे, प्रत्येक स्पंदनी.


"त्याने निर्णय घेतला. अगदी ठाम. तोही माझ्यासाठी. माझ्या हळव्या भावनांना प्रतिसाद देण्यासाठी. माझ्या सरळसोट बोलण्यानं तो कदाचित दुखावला असेल. थोडा चिडलाही असेल; पण माझी बाजू स्पष्ट मांडण्याविना पर्याय नव्हता. मला हातचं राखून वागण्याची सवय नाही. जे आहे, ते मी स्पष्ट करते. माझा स्वभावच आहेच तसा. त्याच्या निखळ, निःस्वार्थी, निर्मळ मनाचा वारंवार प्रत्यय येत होता. अनपेक्षित परिस्थितीचा सामना करताना तो थोडा डगमगेल, असं वाटलं होतं; पण तसं काही झालं नाही. त्याने स्वतःला केवळ व्यक्तच केलं नाही, तर एक जबाबदारी स्वीकारली. अगदी मनमोकळेपणाने. मला असाच मुलगा हवा होता. विचार करून निर्णय घेणारा. दृढनिश्‍चयी. तसंही, if and is noble, then why to worry about means.. शेवट दोघांच्या मनासारखा झाल, यातच मोठं समाधान आहे...'' ती स्वतःशीच बोलत होती.

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...