Saturday, April 4, 2009

Dream Complete

उघड्या डोळ्यांनी आपण,
रंगवत असतो स्वप्न.
आपल्या हातात नसतं
कुठलं पडावं ते स्वप्न.

जागेपणी पाहिलेली स्वप्नें,
ही तर स्वप्नेच असतात.
गाढ झोपेतली स्वप्ने,
तरी कुठे खरी असतात?

रंगवतो आपण स्वप्नें,
मनाला रुचतिल तशी.
प्रत्यक्षात घटना घडते,
प्रारब्धात असेल तशी.

चतुर असते आपले मन,
फक्त सुखासंगे विहार करते.
दुःखाला जागेवरच ठेवून,
सोबतीला न्यायचे विसरते.

सुखाच्या आपल्या स्वप्नात,
दुःख अलगद येऊन पडतं.
आनंदाच्या मधुर दुधात,
निराशेचं विरजण पडतं.

आपल्या स्वप्नी असतो,
फक्त सुखाचा गवगवा.
प्रत्यक्षात मात्र प्रखरतेने,
जाणवतो दुःखाचा दबदबा.

आपली इच्छा असेल ते,
नेहमीच कांही घडत नसते.
भगवंताच्या इच्छेनुसार घडते,
म्हणून ते अगदी योग्य असते.

स्वप्नें जरूर रंगवावीत,
सुखाची किंवा आनंदाची.
मात्र कला अवगत करावी,
दुःखात सुख शोधण्याची

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...