Sunday, April 12, 2009

बालपणीच्या आठवणी

बालपणीच्या पावसातील आठवणी
आठवतात अजुनही मला ते पावसाळ्यातील दिवस
शाळेत जायचा देखील जेव्हा यायचा मला आळस

आठवतो पावसासोबत येणारा तो गार गार वारा
नी मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा
वाऱ्यावर झुलणारी ती हिरवीगार झाडं
नी पावसात बागडणारी ती माझ्यासारखी वेडी मुलं

आठवते मला अजुन ती हौस चिंब भिजण्याची
पावसात जाऊन मनसोक्त गाणी म्हणण्याची
यत्किंचितही नसलेली ती आजाराची पर्वा
आईचा मात्र काळजीने जीव व्हायचा हळवा

आठवतात पाण्यात सोडलेल्या त्या इवल्याश्या होड्या
एकमेकांवर पाणी उडवुन इतरांच्या काढलेल्या खोड्या
ते स्वच्छ धुतलेले कपडे खराब व्हायचे चिखलात
पण आईच्या कष्टाचे विचारही नसायचे मनात

आठवतात मला त्यानंतर कडाडणाऱ्या विजा
नी मग घराकडे पळतांना धडपडुन झालेल्या ईजा
घरात गेल्यावरही ठरलेलं होतं बाबांचं ओरडणं
आईचे मात्र शांतपणे केस कोरडे करणं

आठवतात आईच्या हातचे ते गरमागरम पोहे
नी सर्दी साठी जबरदस्ती घेतलेले ते कडूशार काढे
सरते शेवटी आठवते ते उघडणारे आभाळ
डोळ्यांसमोरुन तरळून जायची मस्तीत घालवलेली संध्याकाळ

अजुनही आठवते मला पावसातील लहानपणीची धमाल
नी आठवताना मग आसवांनी भिजून जातो रुमाल

No comments:

Post a Comment

हर गडी बदल रही रूप जिन्दगी...